खेलो इंडिया अंतर्गत बालेवाडीतील क्रिडा संकुलाचे अद्ययावत होणार

प्रतिनिधी.

नवी दिल्ली – उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याच्या दिशेने खेलो इंडिया अंतर्गत राज्यामधील पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती शिवाजी क्रिडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय आज केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने घेतला. महाराष्ट्रासह देशातील अन्य पाच क्रिडा संकुलांचेही अद्ययावतीकरण केले जाईल.

क्रिडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलेंस(केआयएससीई) मध्ये देशातील 6 राज्यातील क्रिडा संकुलांचे अद्ययावतीकरणाचा निर्णय आज घेतला. यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दिव, मध्य प्रदेश, आसाम, सिक्कीम या राज्यांचा आणि केंद्रशासित प्रेदशांचा समावेश आहे.

या  वर्षाच्या सुरूवातीस मंत्रालयाने कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड या आठ राज्यातील खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (केआयएससीई) येथील क्रिडा संकुलांची निवड अद्ययावतीकरणासाठी केली होती.

केआयएससीईच्या नविनीकरणाबाबत सांगताना श्री रिजिजू म्हणाले, खेळाडूंना जागतिक दर्जाच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने एक सशक्त पाऊल आहे. यामुळे येत्या काळात खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धांमध्ये चमक दाखवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला.

निवड करण्यात आलेल्या क्रिडा संकुलांमध्ये सध्या असलेल्या सोयी-सुविधा आणि भविष्यात करावयाचे बदल हे लक्षात घेऊन निवड करण्यात आलेली आहे. भारत सरकार या केंद्राना विशेष निधी उपलब्ध करून देईल. त्याव्दारे नवीन उपकरणे, तज्ञ प्रशिक्षक, व्यवस्थापकांची नेमणूक केली जाईल.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web