कर्जत येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाचा पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान

प्रतिनिधी.

अलिबाग – जगभरामध्ये जीवघेण्या करोना विषाणूची परिस्थिती असून,जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा महाड येथील तारीख गार्डन या इमारत दुर्घटनेच्या वेळी आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना नि:स्वार्थपणे माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आलेल्या बचावपथकांना, विविध संस्थांना व व्यक्तींना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सुरेश काशिद, तहसिलदार सतिश कदम यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या सत्कारमूर्तींमध्ये रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळी सामाजिक व भावनिक जबाबदारी ओळखून कर्जत येथील आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा क्षेत्रात कार्य करणारे, ‘रक्षा सामाजिक विकास मंडळाचे’ 5 जवान तातडीने शोध व बचावकार्यासाठी कर्जतवरून महाडला रवाना झाले होते. याबद्दल कर्जत तालुक्याचे निवासी नायब तहसिलदार श्री.राठोड यांनी या दुर्घटनेबद्दल या संस्थेला माहिती दिली हाेती व तातडीने मदत व बचावकार्यासाठी महाडकडे रवाना होण्यास सांगितले हाेते. दरम्यान हा प्रवास चालू असताना कर्जत तालुक्याचे नायब तहसिलदार श्री. भालेराव यांनी श्री. अमित गुरव यांना महाडचे तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे संपर्क क्रमांक देऊन त्यांच्या संपर्कात राहायला सांगितले.

महाड येथील दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी घटना होती. दि. 24 ऑगस्ट च्या मध्यरात्री, रक्षा सामाजिक विकास मंडळाचे ज्येष्ठ गिर्यारोहक श्री.अमित हरि गुरव यांच्या नेतृत्वाखाली शोध आणि बचावकार्याची टीम महाडमध्ये पोहोचली आणि रात्रीतूनच त्यांनी शोध व बचावकार्याला तातडीने सुरुवात केली. या शोध आणि बचाव पथकामध्ये कर्जत येथील अक्षय गुप्ता, प्रखर गुप्ता, प्रसाद गिरी व सुमित गुरव यांचा समावेश होता. महाड इमारत दुर्घटनेच्या वेळी बचावकार्याबद्दल अनुभव कथन करताना श्री.गुरव यांनी सांगितले की, त्या घटनास्थळी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पोलीस, विविध बचाव पथके, सामाजिक कार्यकर्ते, जेसीबी, पोकलेन व डंपर पोहोचले होते. काही कालावधीनंतर त्यांनी अपघातग्रस्त ठरलेल्या बिल्डिंगचा मलबा बाहेर काढण्यासाठी जेसीबी व पोकलेन यांना मदतकार्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी जेसीबी/ पोकलेन ड्रायव्हर यांना मार्गदर्शन करणे, योग्य त्या ठिकाणी खणण्यासाठी दिशा दाखविणे, जेसीबी द्वारे खणत असताना समोरच्या मलब्यामध्ये तेथे इमारत पडण्यापूर्वी तेथे राहणाऱ्या व्यक्तींच्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, दागदागिने आढळल्यास प्रशासनाच्या हवाली करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे शोधकार्य करीत असताना वेळोवेळी जेसीबी व पोकलेन चे कार्य थांबून मलब्यामधील मोकळ्या जागेमध्ये आवाज देऊन त्या ढिगाऱ्याखाली अडकलेली व्यक्ती प्रतिसाद देतेय का? हे पाहणे, इत्यादी महत्वाची कामे केली. या सर्व बचावपथकांना व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या च्या टीमला जवळजवळ 18 तासानंतर म्हणजे दि.25 ऑगस्टला फार मोठे यश मिळाले, ते म्हणजे एक लहान मुलगा व काही वेळेनंतर 62 वर्षाची महिला यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. कित्येक तास, नि:स्वार्थीपणे या सर्व बचतपथकांतर्फे शोध व बचावकार्य करण्यात येत होते.

या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक अनुकूल गोष्ट अशी होती की, पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे जेसीबी, पोकलेन आणि इतर गोष्टींच्या साहाय्याने शोध आणि बचाव कार्याला उत्तम वेग मिळत होता. हे शोधकार्य दिवसरात्र चालू असताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, इतर सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी स्थानिक अधिकारी-कर्मचारी हे जातीने दुर्घटनास्थळी हजर होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web