शेतकऱ्याला लाखोंचा चुना लावणारा कल्याण मध्ये अटक  

प्रतिनिधी.

कल्याण– कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढण्याऱ्या डाळींबाला बाजारात मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन नवरा बायकोने एका शेतकऱ्याला  बाजारभावा  पेक्षा  जादा पैश्याचे आमिष दाखून तब्बल  ३३ टन ५७३ किलो डाळींबचा अपहार करून १९ लाख ४५ हजार ९२२ रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. 
याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात लाखोंच्या डाळींबचा  अपहार  केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे . तर बायको फरार झाली असून तिचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. अस्लम हुसेन शेख (४०,रा. काळी मशीद , कल्याण ) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर संतोष भोर (वय, ४३,रा. वडगांव कांदळी ता. जुन्नर ) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्हातील शेतकरी संतोष भोर यांची  वडगांव कांदळी गावात डाळींब पिकवण्याची बाग असून  कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढण्याऱ्या डाळींबाला बाजारात मागणी वाढली. त्यामुळे शेतकरी भोर हे कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये डाळींब विक्रीसाठी जुलै महिन्यात आले होते. त्यावेळी त्याची ओळख आरोपी  अस्लम हुसेन शेख याच्याशी होऊन त्याने बाजारभावा पेक्षा १० रुपये किलो मागे अधिक देतो, असे आमिष शेतकऱ्याला दाखवले. त्यांनतर सुरवातीला डाळींब खरेदी करताना आरोपीने रोख रक्कम देऊन शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला. मात्र २५ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान आरोपीने शेतकरी भोर यांच्याकडून ३३ टन ५७३ किलो डाळींब खरेदी केली . त्याचा एकूण मोबदला १९ लाख ४५ हजार ९२२ रुपये झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याने आरोपी अस्लमकडे पैशाचा तगादा लावला असता  आरोपीने बायकोच्या नावे असलेल्या बँक खात्याचा धनादेश दिला. मात्र तोही धनादेश बाऊंस झाल्याने  अखेर शेतकऱ्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन डाळींबचा अपहार करणाऱ्या  नवरा बायको विरोधात भादवी कलम ४२०, ४०६ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी अस्लमला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अस्लमच्या बायकोचा पोलीस शोध सुरु केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web