कोरोनाच्या संकटातही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जनमाणसांत जाऊन मोठी कामगीरी

प्रतिनिधी.

कल्याण – कोव्हीड – 19 चा प्रादुर्भाव झाल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी जनमाणसांत जाऊन लक्षवेधी कामगीरी केल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात आपल्या परिसरात एकही बालक कुपोषित राहणार नाही आणि होणारही नाही, याची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या धाडसाची दाद दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य, गरीब पालक व गृहिणींकडून उमटत आहेत.
      या संदर्भात डोंबिवलीतील आजदेगावच्या अंगणवाडी झेडपी – 2 या केंद्राशी संपर्क साधून तेथिल कामकाजाचा आढावा घेतला असता तेथील सेविका आणि कर्मचाऱ्यांकडून धक्कादायक माहिती मिळाली.

22 मार्चपासून लॉकडाऊन सरकारने घेतल्यानंतरही या केंद्राच्या सेविका ज्योती पाटील आणि त्यांच्या सहकारी तथा मदतनीस श्वेता सुतार या दोघी महिला अथक परिश्रम घेत आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान पोषण माह – 2020 हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या संदर्भात माहिती देताना अंगणवाडी सेविका ज्योती पाटील म्हणाल्या, गृहभेटी दरम्यान गरोदर स्तनदा मातांना आणि त्यांच्या बाळांचे कोव्हीडपासून संरक्षण कसे करायचे, त्यांनी आहार कसा घ्यायचा, या संदर्भात मार्गदर्शन अर्थात समुपदेशन करण्यात येते. तर कोरोना महामारीच्या काळात जन्मलेल्या बालकांसाठी पहिल्या खेपेच्या सर्व मातांना बेबी केअर किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये सॅनिटायझर, बाळाची गादी, मच्छरदाणी, थर्मामिटर, डायपर, मोजे, रूमाल, मसाज तेल व साबण अशा वस्तूंचा अंतर्भाव असतो. कोरोनाचे संकट ओढावू नये, यासाठी माता व तिच्या बाळाची वजन, उंची मोजून ग्रेडेशन घेतले जाते. त्यानुसार जास्तीत जास्त बालकांच्या पोषणावर भर दिला जातो. तर एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवेंतर्गत किशोरवयीन मुलींच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाते. आजदेगाव व परिसरातही हातावर पोट भरणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना महामारीमुळे अशा कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राहणाऱ्या गरीब-सर्वसामान्य कुटुंबियांसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यावर माहिती देताना केंद्राच्या सेविका ज्योती पाटील म्हणाल्या, विशेष म्हणजे आमची अंगणवाडी शहरी भागात जरी असली तरीही या भागातील सर्वसामान्य, गरीब कुटुंबांतल्या बालकांचे कुपोषण वाढणार नाही, याची काळजी घेतली जाते.

आजदेगावात एकूण 6 अंगणवाड्या आहेत. मात्र सुदर्शननगर गार्डनमध्ये असलेल्या एका लहानश्या खोलीत चालणाऱ्या या केंद्रात पुरेशी जागा नसली तरीही या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो, असेही पाटील म्हणाल्या. लॉकडाऊनमध्ये बालकांना आहार पुरवठा करण्याबरोबरच त्यांच्या पालकांना प्रयोगशील उपक्रम (Activities) व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठविले जातात. हे सर्व उपक्रम बालकांकडून पालकांनी करवून घ्यायचे आणि त्याचे व्हिडीओ आम्हाला पाठवायचे, अशाप्रकारे ऑनलाईन अंगणवाडी सद्याच्या परिस्थितीमुळे चालविण्यात येत आहे. मात्र ज्यांच्याकडे अशा मोबाईलची सुविधा उपलब्ध नाही, अशा पालकांशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याकडून अर्थात बालकांकडून प्रयोगशील उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती अंगणवाडी सेविका ज्योती पाटील यांनी दिली.
      

कल्याण तालुक्याच्या शहर व ग्रामीण भागात एकूण 204 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांतून तब्बल 19 हजार शिशू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गर्भवती व स्तनदा माता यांचे आणि त्यांच्या बाळांचे कोव्हीडपासून संरक्षण करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. सद्या लॉकडाऊनमुळे शिशुंच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र ऑनलाईन पद्धतीने शिशू आणि त्यांच्या पालकांकडून प्रयोगशील उपक्रम (Activities) करवून घेतले जातात. एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत लाभार्थ्यांमधील 6 महिने ते 3 वर्ष आणि 3 ते 6 वर्षांपर्यंतचे शिशू, गरोदर महिला, स्तनदा माता, 11 ते 14 आणि 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुली यांना चणे, मूग, गहू, तांदूळ, तेल, मीठ, मिरची पावडर, हळद, मसुरडाळ, आदी आहारासाठी लागणाऱ्या वस्तूंचा घरपोच पुरवठा केला जातो. शिशू आणि बालकांमध्ये कुपोषण होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी उषा लांडगे यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web