टॅक्सी चालक स्मिता झगडे यांचा प्रेरणादायी प्रवास

प्रतिनिधी.

मुंबई– लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीट वर असलेल्या स्मिता केवळ गाडी नव्हे तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

आज आपल्या निवासस्थानी मंत्री ॲड. ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.

मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली ७ वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमधे चारचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. ३ महिने कुठलीही कमाई नाही. एकल पालकत्वाची जबाबदारी.

अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं. नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता. अनेकांनी त्यांना हे बाईचे काम नाही, यात पडू नये असे सल्ले दिले. पहिल्याच दिवशी १ हजार ५०० रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल अशी आशा त्या बाळगतात.

आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता भारावून गेल्या. “ठाकूर मॅडमनी काही झालं तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला. आज मला मी योग्य निर्णय घेतला याची खात्री झाली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या. अजून एक टॅक्सी घेत त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो असा संदेश त्या महिलांना देतात.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web