कोरोना महामारीचा असाही गैरफायदा,भामट्यांनी लांबविले सोन्याचे दागिने

प्रतिनिधी.

डोंबिवली – कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधी, नेते-पुढारी, सेवाभावी संस्था, दानशूर मंडळींनी गरीब-गरजूंना अन्न-धान्यासह जीवनोपयोगी वस्तूंचे वितरण करून सेवाधर्माचे पालन केले. आजही अनेक मंडळी लोकांसाठी मदतकार्य करत आहेत. मात्र दुसरीकडे भामट्यांनी सर्वसामान्य असहाय्य पादचाऱ्यांना मदत करण्याच्या भूलथापा देऊन लूट सुरू केल्याचे एका घटनेतून समोर आले आहे.
      कल्याण जवळच्या होमबाबा टेकडी परिसरातील स्नेहवर्धक नगरात राहणाऱ्या संजना लक्ष्मण पोळ (60) या त्यांची बहीण कांताबाई अशा दोघीजणी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास कचोरे गावाजवळील मोहन सृष्टी गृहसंकुला समोरून जात होत्या. इतक्यात 25-30 वयोगटातील अनोळखी तरुणांनी या दोघा बहिणींना अडविले. एक सरदारजी कोरोना महामारीमुळे गरिबांना कपडे, धान्य, पैसे वाटत आहेत, तुम्हीही चला, पण तुम्ही गरीब दिसाव्यात म्हणून गळ्यातील दागिने काढून पर्समध्ये ठेवा, असा सल्ला त्या दोघांनी संजना आणि कांताबाई यांना दिला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या दोन्ही बहिणींनी त्यांच्याकडील जवळपास 27 हजार रुपये किंमतीचे दागिने काढून मोबाईलच्या पाकिटात टाकले व ते पाकीट कापडी पिशवीत ठेवले. मात्र यातील एकाने पिशवीला गाठ मारून देतो, असे सांगून हातचलाखीने दोघींची नजर चुकवून हे सर्व दागिने लांबविले. त्यानंतर या दोन्ही भामट्यांनी तेथून हळूच पळ काढला. थोड्यावेळाने पिशवीतून दागिने गायब झाल्याचे दोघा बहिणींच्या लक्षात आल्यानंतर नजीकच्या चौकीतील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर यातील संजना पोळ यांच्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात फरार भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web