भामरागडमधील पूरपरिस्थितीची पालकमंत्री यांच्या कडून पाहणी

प्रतिनिधी.

गडचिरोली – जिल्ह्यातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पुरामुळे अनेक घरांचे, शेतीचे तसेच भामरागड शहरातील व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबाबत पालकमंत्री तथा नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड या ठिकाणी जाऊन त्याबाबत पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित बाधितांना पुनर्वसनासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया राबविण्यात येईल असे आश्वासन दिले.

भामरागड तहसील कार्यालयात पुरामुळेबाधित झालेल्या 120 गावांमधील 100 हून अधिक नागरिकांना ब्लॅंकेट व जीवनावश्यक साहित्याचे कीटवाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी भामरागड तालुक्यातील सर्व 8400 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य कीट व प्रत्येकाला एकेक ब्लॅंकेट मदत म्हणून दिले. याबाबत उर्वरित साहित्य वाटप येत्या काळात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री म्हणाले की, प्रशासन भामरागडबाबत अतिशय संवेदनशील असून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवित येणार आहेत. तालुकावासियांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी सदैव असणार आहे, असा दिलासा त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्याधिकारी सूरज जाधव यांनी भामरागड पूरस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे पालकमंत्र्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, सहाय्यक जिल्हाधिकारी मनोज जिंदल, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, अनमोल कांबळे उपस्थित होते

यावेळी त्यांनी पूरस्थितीबाबत पूरग्रस्तांशी संवाद साधला व आवश्यक मदतीबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. यामध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे, घरांचे व इतर ठिकाणचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या दुःखद निधनामुळे आयोजित कार्यक्रमांमध्ये स्वागत व सत्कार न स्वीकारता त्यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पर्लकोटा नदीवरील पूलाला भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी नव्याने पूल होणार आहे, त्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी त्यांनी भामरागड मधील दरवेळेस पुराच्या पाण्यात जाणाऱ्या घरांना व व्यापारी वर्गाला नवीन ठिकाणी पुनर्वसनासाठी आवश्यक मदत जिल्हा नियोजन मधून नगर विकास खात्यांतर्गत देण्यासाठी तातडीने प्रयत्न करू असे सांगितले.

कार्यक्रमात कोरोनाबाबत बचाव करण्यासाठी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. मास्क वापरा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे ते म्हणाले. अजून एक ते दोन महिने आपणाला या कोरोनाशी लढा द्यावयाचा आहे. काळजी करणं बंद करू नका. आवश्यक काळजी घेणे आपले कर्तव्य आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वडसा व सावंगी येथील पूरस्थितीची केली पाहणी :

यानंतर त्यांनी देसाईगंज वडसा येथील पूरग्रस्तांना व सावंगी येथील बाधितांना भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. सावंगी येथील तसेच देसाईगंज शहराजवळील पुरामुळे झालेल्या नुकसानाचेही पंचनामे तातडीने करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या. सावंगी येथील भात आणि तूर शेतीचे झालेल्या नुकासानाची पाहणी केली. पालकमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक भरपाई वेळेत मिळेल आम्ही तुमच्या पाठिशी आहे असा दिलासा दिला.

या भेटीत हनुमान वार्ड वडसा येथे त्यांनी 250 पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे कीट वाटप केले. तसेच सावंगी येथील पुर स्थितीमुळे बाधितांनाही 250 कीटचे वाटप केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web