प्रतिनिधी.
कल्याण – भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने गजानन महाराज मंदिरासमोर घंटानाद आंदोलन संपन्न झाले. गेली पाच महिने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. राज्यातील सर्व मंदिरे तातडीने सुरू करावीत यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
कोरोना (कोविड) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपुर्वी बंद केलेली मंदिरे(प्रार्थनास्थळे) अद्यापपर्यंत बंद स्थितीत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया १ जून २०२० पासून सुरू झालेली आहे. यानुसारच राज्यातील दारुची दुकाने खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. असे असताना सर्व मंदिरे(प्रार्थनास्थळे) बंद ठेवून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्र हे भक्ती सांप्रदायाची उज्ज्वल परंपरा असलेले सुसंस्कृत राज्य आहे. तसेच सर्व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी त्या भागातील अनेक कुटुंबांची उपजीविका व संबंधित भागाची अर्थव्यवस्था तेथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. परंतु मागील पाच महिन्यांपासून मंदिरे(प्रार्थनास्थळे)बंद असल्यामुळे तेथील सर्वकाही विस्कळीत झाले आहे.अशा वेळी दीर्घकाळ मंदिरे(प्रार्थनास्थळे) बंद ठेवणे महाराष्ट्र राज्याच्या भक्ती परंपरेला भूषणावह नाही. म्हणून राज्यातील सर्व मंदिरे(प्रार्थनास्थळे) कायमस्वरूपी खुली करावीत अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पंडित, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या प्रिया शर्मा,भावना मनराजा, प्रताप टूमकर, विशाल शेलार, गणेश गायकर, सदा कोकणे,रोहित लांबतुरे, राज खैरणार, हर्षल साने आदी उपस्थित होते. सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करुन घंटानाद आंदोलन करण्यात आले.