शाळा आपल्या दारी,एकात्मिक आदिवासी प्रकल्प अकोला कार्यालयाचा उपक्रम

प्रतिनिधी.

अकोला – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमधील शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गरीब तसेच दुर्गम भागात मोबाईल वा नेटवर्क सुविधा उपलब्ध नसणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.यासंदर्भात प्रकल्प अधिकारी अकोला राजेंद्रकुमार हिवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत असून शासकिय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी पुरेसे साधन नसल्याने अनलॉक लर्निंग उपक्रमातंर्गत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

अकोला प्रकल्पात शासकीय आश्रमशाळा कोथळी, पणज, तरोडा, घाटबोरी, सायखेड, शेलूबाजार किन्हीराजा, मुसळवाडी या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहेत. या शाळामधून २३४३ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याचबरोबर १९ अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुद्धा सुमारे ६८३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आश्रमशाळा बंद असून विद्यार्थी गावातच आहेत. अशा परिस्थितीत अकोला प्रकल्पामधील शासकीय व अनुदानित आश्रमशाळामधून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्यासाठी अनलॉक लर्निंग अंतर्गत ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी या शाळा मधील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, तथा सहायक प्रकल्प अधिकारी यांचे पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून या शाळांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गावांमध्ये शिक्षकांनी जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली आहेत. त्यानंतर शिक्षक व गावातील स्थानिक संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखुन शिक्षण देणे सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविणे, स्वाध्याय, गृहपाठ देणे, गृहपाठ तपासणे सोबतच इतर उपक्रम देणे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेबरोबरच अनुदानित आश्रमशाळामध्ये सुद्धा हा उपक्रम दुर्गमभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकाश देणारा ठरत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web