वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार ऊर्जामंत्री यांचे आश्वासन

मुंबई-० विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह २६ तारखेला बैठक झाली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सूचना व समस्या ऐकून घेत त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.

कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योद्धे बनून वीज पुरवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत वीज कर्मचाऱ्यांचे डॉ.राऊत यांनी कौतुक केले. तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत जे मुद्दे मांडले त्याचा सर्व समावेशक विचार करुन अडचणी सोडविण्याची ग्वाही डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.

मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अनुशेष, बदली धोरण, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, फ्रँचाईझी धोरण, कंत्राटी कामगार, पदोन्नती, वीज कायदा सुधारणा, वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे, निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा व मागणी करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

कोरोना कालावधीत सर्व वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात टाकून 24 तास अहोरात्र सेवा दिली. त्या सर्व कोविड योद्ध्यांचे आमदार भाई जगताप यांनी कौतुक केले. तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्या दिवशी स्वतः डॉ.राऊत यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल भाई जगताप यांनी डॉ.राऊत यांचे आभार मानले.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर पवन कुमार गंजु व विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web