पैसे चोरल्याच्या संशयावरून टपरी कामगाराचा खून क्राईम ब्रँचने ठोकल्या खुन्याला बेड्या

प्रतिनिधी.

डोंबिवली – पान टपरीवरचा कामगार पैसे चोरतो या संशयावरून खुन करुन त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तलावात टाकून पसार झालेल्या खुन्याला क्राईम ब्रँचने अटक केली आहे. क्राईम ब्रँचने या अत्यंत किचकट व गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघड केला आहे. या गुन्ह्यात आणखी दोघांचा समावेश असून पोलिस त्यांच्याही मागावर आहेत.
सुनिल श्रीराजवा पटेल (28, रा. पांडुरंग वझे कम्पाऊंड, ललीत काट्याजवळ, मानपाडा) असे अटक केलेल्या खुन्याचे नाव असून त्याला शुक्रवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी सांगितले.
     उपलब्ध माहितीनुसार कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या क्लासीक हॉटेलच्या पानटपरीवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणादरम्यान त्यातील एकाला ठार मारल्याची माहिती कळताच क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूपण दायमा, फौजदार नितीन मुदगुन, हवा. दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, विलास मालशेटे, राजेंद्र खिलारे, अरविंद पवार, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, हरिश्चंद्र बंगारा, बाळा पाटील, अजित राजपुत, राहूल ईशी या पथकाने तपासचक्रांना वेग देऊन शोध मोहीम सुरू केली. या पथकाने सुनिल पटेल याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याने धक्कादायक माहिती उघड केली. सुनिल पटेल याने स्वत: त्याच्या इतर दोन कामगारांसह टपरीवर काम करणारा कामगार सुरीज स्वरूपवा पाल (18, मूळचा रा. ग्राम भदेहदू तह. बबेरू, जि. वादा, उत्तरप्रदेश) याला शुक्रवारी दुपारी 2 ते साडेतीन दरम्यान दरम्यान पानटपरीच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर लाकडी दांडका, गॅस पाईप व कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच डोके जमीनीवर व भिंतीवर आदळून ठार मारले. त्यानंतर सुरीजचा मृतदेह गोणपाटात भरून त्याच क्लासीक हॉटेलच्यामागील बाजूस असलेल्या दलदलयुक्त तलावात फेकून दिला. सुनील पटेल याने अन्य दोन साथीदारांसह सुरीज पाल याला ठार मारल्याची कबूली दिली. या माहितीनुसार मानपाडा पोलीसांसह घटनास्थळी तलावात उतरून पाण्यात मृतदेह शोध घेत असतानाच सदर तलावाच्या उत्तर दिशेच्या काठाजवळ दलदलीत लाकडी प्लायवूडच्या खाली एक गोणी आढळून आली. सदर गोणपाटात बांधलेला मृतदेह सुरीज पाल याचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सुरीजचा मृतदेह केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक मानपाडा पोलिसांनी सुरू केला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web