प्रतिनिधी.
कल्याण – खारी बटर विक्रीच्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना कल्याण मधील वालधुनी परिसरात घडली आहे. रोशनलाल कनोजिया (४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून हि हत्या करणाऱ्या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण मधील वालधुनी येथे राहणारा अमर बहादूर विपत कनोजिया याचा कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाऊनमध्ये हा इस्त्रीचा व्यवसाय बंद पडल्याने अमर कनोजिया याने खारी बटर टोस्ट पाव विकण्याचा व्यवसाय सुरु केला. जून महिन्यात अमर याचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या आणि पाव विक्री करणाऱ्या सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दिन अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी यांच्यात पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. अमरने खारी बटर टोस्ट पाव विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याने सलाउद्दीन अन्सारी याच्याकडील गिर्हाईक अमरकडे जाऊ लागले होते याचा देखील राग त्यांच्या मनात होता.
आज सकाळी देखील अमर कनोजिया आणि सलाउद्दीन यांच्यात असाच वाद सुरु असतांना सलाउद्दीन अन्सारी, काशीबुद्दिन अन्सारी यांनी अमर याला शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्या छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अमर याचे भाऊ रोशनलाल कनोजिया हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी जोर जोराने मारहाण केली. यामुळे रोशनलाल खाली पडले असता, त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी अमर कनोजिया याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सलाउद्दीन अन्सारी (२५), काशीबुद्दिन अन्सारी (२८) आणि मोहम्मद अन्सारी (२०) या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली.