डोंबिवली एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला आग

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील ड्रीमलॅंड डाईंग नामक कापडावर प्रक्रिया करणाऱ्या रासायनिक कंपनीला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
     डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील रासायनिक कंपनीला आग लागण्याची महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. रक्षाबंधनच्या दिवशी याच परिसरातील एका कंपनीला आग लागून वित्तहानी झाली होती. त्यातच रविवारी 23 ऑगस्टला दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास ड्रिमलॅंड या रासायनिक कंपनीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी असा प्रथम अंदाज बांधला जात आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या संदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाचे उपसंचालक लक्ष्मीकांत गोराणे माहिती देताना म्हणाले, या कंपनीत पॉलिमर्स बनविण्याचे काम केले जाते. हे काम सुरु असताना कंपनीच्या एका खोलीत ग्राईंडींग मशीनच्या मोटारमध्ये स्पार्क झाल्याने आग लागली. ही आग इतरत्र पसरली. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू आग भडकल्याने कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलास कळविले. या घटनेची माहिती पूर्णपणे घेतली जात असल्याचे गोराणे यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web