दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान- महसूलमंत्री थोरात

प्रतिनिधी.

मुंबई- संगमनेर तालुक्यातील मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविला असून हा पुरस्कार संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

आज केंद्र सरकारच्या वतीने विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली याबाबत बोलताना श्री. थोरात म्हणाले की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू हा रोहित शर्मा यांना मिळाला तर अर्जुन पुरस्कारांमध्ये रोइंग पटू दत्तू भोकनळ, महिला खो खो संघाची कर्णधार सारिका काळे, कुस्तीपटू राहुल आवारे या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी बाजी मारली आहे. दत्तू भोकनळ हा रोइंग मधून देशाचे प्रतिनिधित्व करत असून त्याने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला मोठे यश मिळवून दिले होते. सातत्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मंगळापूर येथील अत्यंत गरिब कुटुंबातील दत्तु भोकनळ याने गरिबीचे मोठे चटके सोसले. विहीरीचे खोदकाम केले. त्याची भारतीय सैन्यात निवड झाल्यावर त्याने रोईंग खेळावर लक्ष केंद्रीत करुन आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ध्येय गाठले. आज त्याच्यामुळे अनेक जण रोईंगचे चाहते झाले. संगमनेर तालुक्यातील अजिंक्य राहणे हा ही तरुणांसाठी रोल मॉडेल आहे. खेळांमधून करिअरच्या अनेक संधी आहेत. पालकांनी मुलांवर आपली आवड न लादता त्यांना खेळू द्यावे. मुलांनी मोबाईल ऐवजी मैदानी खेळांकडे वळावे. यासाठी आपण तालुक्यात विशेष योजना राबवित आहोत. यावर्षी कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव असून अशा कठीण काळात खेळाडूंनी मिळवलेले हे यश नेत्रदीपक आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web