३१ ऑगस्टला पंढरपुरातील वारकरी सांप्रदयाच्या आंदोलनात सहभागी होणार- प्रकाश आंबेडकर

संघर्ष गांगुर्डे

मुंबई – राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, भजन कीर्तन करायला परवानगी दिली जावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेने पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वतः 31 ऑगस्ट रोजी पंढरपुरात आयोजित आंदोलनाला पाठिंबा म्हणून सहभागी होणार आहेत.

वारकरी संप्रदयातील साधुसंत त्याचप्रमाणे मठातील महाराज हे येत्या 31 तारखेला पंढरपुरात मोठे आंदोलन करणार आहेत. राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने या लॉक डाऊनचा विरोध करीत राज्यात आंदोलनाला सुरुवात केली. यापूर्वी लॉकडाऊनच्या विरोधात राज्यभर निवेदने देण्यात आली. त्यानंतर राज्य भरातील एसटी तसेच शहरांतर्गत चालणाऱ्या बसेस चालू करण्यात याव्यात, तसेच छोटे उद्योग धंदे चालू करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून राज्यभर डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढल्याने लवकरच राज्यातील जिल्हा व शहरांतर्गत बससेवा चालू करण्यात येणार आहे. वंचितच्या आंदोलनाला मिळालेले हे मोठे यश आहे. आता राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी म्हणून 31 ऑगस्ट रोजी पंढरपूर या ठिकाणी हरि भक्त पारायण यांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येणार असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web