तात्पुरत्या दवाखान्यांपेक्षा पालिकेच्या रुग्णालयावर खर्च केल्यास सुसज्ज दवाखाना तयार होईल- मनसे आ. राजू पाटील

प्रतिनिधी.

डोंबिवली – पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रूक्मिणीबाई या दोन्ही दवाखान्यांची परिस्थिती व्हेंटीलेटरवर असल्यासारखीच झाली आहे. सध्याच्या काळात तात्पुरत्या दवाखान्यांवर अस्थायी,अवास्तव खर्च करण्यापेक्षा हाच पैसा या दवाखान्यांवर खर्च केल्यास नागरीकांसाठी एक सुसज्ज दवाखाना तयार होऊ शकतो असे मत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

केडीएमसी क्षेत्रात कोरोना बाधीत रूग्णसंख्या कमी होत नसली तरी स्थिर आहे. तसेच पालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेतलेले खाजगी आणि तात्पुरते दवाखाने तसेच विलगीकरण कक्षांची संख्या बऱ्यापैकी पुरेशी आहे. परंतु तरीदेखील येणाऱ्या काळात कोरोनाबाधीत रुग्णांसाठी बेड कमी पडू नयेत म्हणून पालिका राज्य सरकारच्या खर्चाने तात्पुरते दवाखाने उभारण्याचे काम सुरूच असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रूक्मिणीबाई या दोन्ही दवाखान्यांची परिस्थिती व्हेंटीलेटरवर असल्यासारखी झाली आहे. सध्याच्या काळात तात्पुरत्या दवाखान्यांवर अस्थायी, अवास्तव खर्च करण्यापेक्षा डोंबिवलीतील शास्त्रीनगर दवाखान्यावर खर्च केल्यास नागरीकांसाठी एक सुसज्ज दवाखाना तयार होऊ शकतो आणि पालिकेचा तसेच करदात्या नागरीकांचा पैसा सत्कर्मी लागू शकेल असे आवाहन आमदार राजू पाटील यांनी केले आहे.तसेच याबाबत आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही ट्विट करत ही बाब निदर्शनास आणली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web