पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला व बालविकासभवनाचे उद्घाटन

अमरावती – प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीसह सगळ्याच पातळ्यांवर शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेत महिला व बालविकासभवनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, महिला व बालविकास सभापती पूजाताई आमले, शिक्षण सभापती प्रियांकाताई दगडकर, माजी सभापती जयंतराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, उपायुक्त अर्चना इंगळे, सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, महिला व बालविकासासाठी योजना राबवणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत म्हणून महिला व बालविकासभवनाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. यामुळे योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी मदत होणार आहे, तसेच नागरिकांनाही एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. शासनाकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रयत्न होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पातही महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. जिल्हा नियोजनातून दरवर्षी एक कोटी रूपये महिला विकास योजनांसाठी खर्च करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून बचत गटांचे सक्षमीकरण, त्यांच्या वस्तूंचे विपणन यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत विक्री केंद्रे ठिकठिकाणी उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. महिला संरक्षणासाठी भक्कम कायदाही लवकरच येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

आमदार श्रीमती खोडके म्हणाल्या की, विभागाच्या सर्व योजना प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य शासन पुढे नेत असताना या सुविधेमुळे कार्याला गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. देशमुख, श्री. येडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्हा राज्यात अव्वल आहे. एक हजारहून अधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत, अशी माहिती श्री. थोरात यांनी दिली. योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण यावेळी झाले. धारणी मेळघाट लोकसंचालित साधन केंद्र या संस्थेला 33 लक्ष 44 हजार रूपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.

उमेद अभियानाअंतर्गत स्वयंसहायता समूहांच्या साह्याने अस्मिता योजनेत अस्मिता प्लस हे सॅनिटरी नॅपकिन अत्यंत अत्यल्प दरात जि. प. शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी व अल्प दरात इतर महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती ‘उमेद’चे सचिन देशमुख यांनी दिली.श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web