कांदिवलीत शिंपोली अद्ययावत क्रीडा संकुल होणार

प्रतिनिधी.

मुंबई – कांदिवली येथे नव्याने बांधण्यात येणारे शिंपोली क्रीडा संकुल हे अद्ययावत क्रीडा संकुल असणार आहे. या क्रीडा संकुलासाठी लागणारे सर्व ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवून प्रत्यक्ष बांधकामाला तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश  क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी दिले.

मंत्रालयात शिंपोली (कांदिवली) येथील विभागीय क्रीडा संकुलात क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते .

श्री. केदार म्हणाले, क्रीडा संकुलासाठी एक रुपया नाममात्र भाडे देण्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलात दोन हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. या क्रीडा संकुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेच्या वेळी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण आणि साहित्यासह विविध सुविधा उपलब्‍ध करण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलात विविध मैदानी खेळांसह इनडोअर खेळांसाठीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच निवास व्यवस्था क्लब, प्रशिक्षणाच्या सुविधा या क्रीडा संकुलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या बैठकीस खासदार गोपाल शेट्टी यांच्यासह क्रीडा विभाग, मुंबई महानगरपालिका आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web