तहसिलदारांची बनावट सही,शिक्का करून बिगरशेती आदेश देणारा आरोपी अटकेत

प्रतिनिधी.

कोल्हापूर – तहसिल कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी, शीतल मुळे-भांमरे यांची बोगस सही करून जमिनीचा बिगरशेती बोगस आदेश देणारा आरोपी गजानन रवींद्र पाटील (वय 33 राहणार शिवाजी गल्ली, कणेरी, ता. करवीर) यास गोकुळ शिरगाव पोलीसांनी अटक केली. गोकुळ शिरगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी, करवीर तहसिल कार्यालयचे मंडळ अधिकारी दिपक मारूती पिंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नेर्ली येथील बेबीताई श्रीकांत मांडरेकर यांच्या मालकीची नेर्ली येथील जमीन गट नं. 623 क्षेत्र 0.37.89 पैकी 0.21.00 चौ.मि. याचे अकृषक(बिगरशेती) प्रकरण फिर्यादीकडे चौकशी करीत असताना या प्रकरणाच्या चौकशीअंती अर्जदार यांचे जमिनीबाबत अकृषक (बिगरशेती) चा आदेश यातील आरोपी याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करीत असल्याची बतावणी करून श्रीमती मांडरेकर यांचे एकाच गटाचे करवीर तहसिल कार्यालयाचे आदेश क्र.जमिन-2/एसआर/912/2019 दिनांक 25 नोव्हेंबर 2019 आणि क्र.जमिन-2/एसआर/369/2019 दिनांक 25 नोव्हेंबर 2019 चे दोन बिगरशेती (अकृषक) आदेश तयार केले होते. त्यावर तहसिल कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसिलदार सचिन गिरी व शीतल मुळे-भामरे यांची बोगस सही करून दिल्याचे दिसून आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार मानसिंग रजपूत, बाजीराव पोवार, पोहेकॉ प्रदिप जाधव, पो.ना. अरूण नागरगोजे, संतोष तेलंग, नितीन सावंत, संदिप जाधव यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास 24 जुलै रोजी गुन्ह्यात अटक केली.या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी गजानन पाटील यास प्रथम 27 जुलै 2020 व त्यानंतर 29 जुलै 2020 अखेर पोलीस कोठडी मिळाली. त्या मुदतीत आरोपी गजानन पाटील याने भू-धारकांना बनावट अकृषक बिगरशेतीचे आदेश त्याच्या पोवार माळ कणेरी येथील राहत्या घरात त्याच्या वापरातील संगणक, प्रिंटर-स्कॅन, कॉपी, व पेनड्राईव्हमध्ये करून शिक्के तयार करण्याचे मशिन खरेदी करून त्या मशिनमध्ये स्वत: आरोपीने शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केल्याची कबुली दिली. आरोपीकडून वापरातील संगणक प्रिंटर, पेनड्राईव्ह, शिक्के तयार करण्याचे मशिन व त्याचे साहित्य आणि बनावट तयार शिक्के असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.यातील आरोपी गजानन पाटील याने बिगरशेतीचे बनावट आदेश करवीर तालुक्यातील बऱ्याच भुधारकांना देवून त्यांची फसवणूक केल्याचे तपासांत निष्पन्न होत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण, सहाय्यक फौजदार मानसिंग रजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव पोवार करीत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web