कृषी विभागाविरोधात वंचितचा एल्गार, वितरकांवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी.

परभणी – बोगस सोयाबीन शेतकऱ्यांच्या माथी मारून प्रचंड माया जमविल्यानंतर आता वितरकांनी कारवाई होऊ नये म्हणून बंदचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाने  कारवाईच्या नावाखाली वेळकाढूपणा केला आहे. त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वितरकांवर कारवाईची मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे एक हजार चारशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत केवळ पंचनामा करण्याच्या पलीकडे काहीही कारवाई कृषी विभागाने केली नाही. अशा बोगस बियाणे विकणाऱ्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे वंचितचे राज्य समन्वयक डॉक्टर धर्मराज चव्हाण यांनी सांगितले. कृषी अधिकार्‍यांचे व्यापारी प्रेम पाहता कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, गुण नियंत्रण विभाग व सरकारची प्रमाणित बियाणे मार्गदर्शक तत्व असताना असे बोगस बियाणे विक्रीसाठी कसे येतात हा एक गहन प्रश्न आहे. याचा अर्थ असा की कृषी विभाग व वितरक यांच्या मध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत असावा किंवा वितरक कृषी विभागाला गृहीत धरीत नसावे असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. यापुढे शेतकऱ्यांना बोगस बियाणे, फवारणी औषधे, खते यांची बोगस विक्री केल्यास वंचित स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web