उल्हासनगर मध्ये कोरोना उपचारासाठीच्या इंजेक्शनचा काळा बाजार, महिला गजाआड

प्रतिनिधी.

उल्हासनगर – कोरोना आजारावर उपचारासाठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळत आहेत व अशी बातमी प्राप्त होताच अधिकारी याबाबत सखोल शोध घेऊन, बनावट ग्राहकांद्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न करीत आहेत.

अशीच माहिती  २३ जुलै  रोजी  प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळाली. उल्हासनगर ३ मध्ये एक महिला अक्टरमा ४०० या औषधाची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करीत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा अन्वेषण युनिट ३, पोलिसांनी सापळा रचून श्रीमती निता पंजवानी रा. उल्हासनगर. ३, हिला सिपला कंपनीचे टोलसीझुमब  अक्टरमा ४००, इंजेक्शन ज्याची छापील किंमत रु ४०,५४५ आहे, सदर इंजेक्शन रु  ६० हजार रुपयांना विना औषध चिठी , विना परवाना विक्री करताना रंगेहाथ पकडले.  

सदर महिलेने औषध विक्री करताना रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन याची मागणी अथवा पडताळणी  केली नाही. या प्रकरणी श्रीमती पाष्टे औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये  गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे. हि कारवाई सह. आयुक्त विराज पौनीकर,सह.आयुक्त प्रवीण पवार,सह आयुक्त सुनील भारद्वज याचा मार्गदर्शना खाली निशिगंधा पाष्टे,नितीन अहेर,संदीप नरवाना यांनी केली.

अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अशा काळा बाजार करणारे  विक्रेत्यांवर नजर ठेवून आहेत व आतापर्यंत एकूण ४ कारवाया करून १५ लोकांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्री यावर नियंत्रण ठेवण्याच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आली.  

रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web