केडीएमसीकडे रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी – डायलिसिस रुग्णांसाठी एखाद्या तरी रुग्णालयात सुविधा द्या

कल्याण – सध्या कल्याण-डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने सर्वच शासकीय यंत्रणा त्याच्याशी लढण्यासाठी उपाययोजना आणि सुविधा निर्माण करत आहे. मात्र अशा परिस्थितीत डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांनी जायचं कुठे असा सवाल उपस्थित करत अशा रुग्णांसाठी एखाद्या तरी रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केडीएमसीकडे केली आहे. आज सर्वत्र कोरोनाचीच चर्चा केली जात आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने इथली बहुतांश हॉस्पिटल ही कोवीड रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आली आहेत. त्यामध्ये अशा रुग्णालयांचाही समावेश आहे ज्याठिकाणी नियमितपणे रुग्णांचे डायलिसिस केले जायचे. मात्र त्यांचेही कोवीड रुग्णालयात रुपांतर झाल्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्याठिकाणची डायलिसिस सुविधा बंद करण्यात आली आहे. परिणामी डायलिसिस करण्यासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांची मोठी गैरसोया होत असून आम्ही करायचं काय? सर्वच रुग्णालये पालिकेने कोवीड केल्याने आम्ही जायचं तरी कुठे ? असे संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारले जात आहेत.  तर डायलिसिससाठी फिरत असताना एखादा निगेटीव्ह रुग्ण कोवीड पॉजिटीव्ह झाला तर त्याच्यासाठी कल्याणात एकाही रुग्णालयात सुविधा नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते अशी माहिती एका रुग्णाचे नातेवाईक उल्हास जामदार यांनी दिली. या सर्व अडचणींचा विचार करता महापालिकेने कल्याणातील एखाद्या तरी रुग्णालयात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणीही त्यांनी इतर सर्व डायलिसीस रुग्णांच्या वतीने केली आहे. कोवीडशी लढण्यासाठी पालिका करत असलेल्या प्रयत्नांबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र त्याचवेळी डायलिसिस किंवा कॅन्सरसारख्य गंभीर आजारांवरील उपचाराची सुविधा बंद करणे अजिबात योग्य नाही. अशा गंभीर आजाराच्या रुग्णांचा महापालिका प्रशासनाने विचार करून तातडीने अशा रुग्णांना दिलासा देण्याची गरज आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web