नाशिक येथील ज्युपिटर कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यान कडून पाहणी

प्रतिनिधी.

नाशिक – नाशिक शहरामध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिक शहरात नव्याने हॉटेल ज्युपिटर येथे ज्युपिटर कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, आरोग्य अधिकारी डॉ.त्रंबके महापालिका नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड, डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. गौतम गांगुर्डे, डॉ.स्वप्नील महाले, कैलास मुदलियार उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी या कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोरोनाबाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देत शासनस्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचेही श्री. भुजबळ म्हणाले. तसेच शासनाने सुचविलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आदेशही संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

नाशिक मधील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच सकारात्मक ओळख निर्माण केलेल्या न्यु रिदम हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून डॉ. अभिनंदन जाधव, डॉ. स्वप्नील महाले आणि डॉ. गौतम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युपिटर कोविड सेंटर कार्यान्वित झाले आहे. ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये एखाद्या खाजगी रुग्णालयात प्रमाणेच या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये यामध्ये ऐकू १०० बेडसची व्यवस्था असून हे कोविड सेंटर फोर स्टार सुविधांनी परिपूर्ण असणार आहे.

यामध्ये रुग्णांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, २० ऑक्सिजन बेड्स, ४ व्हेंटिलेटर यांसह ४० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

या खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहे, त्याचबरोबर हास्यक्लब, रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा आणि विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्युपिटर कोविड सेंटर हे खाजगी असले तरी शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दरानुसार कोरोनाबाधित रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात उपचार इथं उपलब्ध असणार आहे असल्याची माहिती डॉ.अभिनंदन जाधव व त्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web