कल्याण – आपल्या विविध मागण्यांबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्णयाकडे राज्यातील कंत्राटी वीज कामगार डोळे लावून बसले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते.लॉकडाऊन काळात कर्तव्य बजावताना १८ कंत्राटी वीज कामगारांचा मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झालेल्यांना आर्थिक मदत मिळावी, कामगारांना शाश्वत रोजगार आणि कंत्राटदार विरहित वेतन मिळावे, मेडिक्लेमसह अन्य सुविधा मिळाव्यात आदी कंत्राटी कामगारांच्या प्रमूख मागण्या आहेत. यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करत असून त्याचा निर्णय घेण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेण्याबाबत उर्जामंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या बैठकीत कंत्राटी वीज कामगारांना निश्चितच न्याय मिळेल अशी अपेक्षा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील कंत्राटी वीज कामगार तुटपुंज्या पगारावर आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काम करत असून त्यांना न्याय मिळवून देण्याचा दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच राज्यातील 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेबाबतही ऊर्जामंत्री काय निर्णय देतात याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.