स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार – मुख्यमंत्री

प्रतिनिधी.

मुंबई- जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या‍ विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे  बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते आज झाले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले , देशाचे माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा ‘आधुनिक भगीरथ’ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.  हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. आज प्रकाशित झालेल्या ‘लोकराज्य’च्या स्व. शंकरराव चव्हाण विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.

स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते. सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगात आई-वडिलांसारखा गुरु नाही. त्यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. स्व. चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असं हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. मी शाळेत असताना शंकररावांना पाहिलं होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web