प्लाझ्मा थेरपी संदर्भात फसवणूक होऊ नये म्हणून जागरूक रहा

प्रतिनिधी.

मुंबई – कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’कोविड -१९ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे.

प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.

प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात.

सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्रीसंदर्भात फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. तथापि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे, सावध असावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे.

जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा. तसेच http://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web