शाळेतून पुस्तके गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा- राज्यमंत्री बच्चू कडू

प्रतिनिधी.

अकोला – खाजगी शिक्षण संस्था चालकांना त्यांच्याच शाळेतून विद्यार्थ्यासाठी लागणारी वह्या पुस्तके, गणवेश इ. साहित्य खरेदीची पालकांना सक्ती करता येत नाही. तशी त्यांनी केल्यास त्यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित संस्थाचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले. यासंदर्भात आज अकोला येथे पालकांचे शिष्टमंडळ ना. कडू यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी पालकांनी तक्रारीचे निवेदन देऊन संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके, शालेय गणवेश व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी शाळांकडूनच किंवा शाळेने नेमुन दिलेल्या विक्रेत्याकडूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते, याबद्दल आपली व्यथा मांडली. त्यावेळी संबंधित पालकांना आश्वस्त करतांना ना. कडू म्हणाले की, शिक्षण संस्थाचालक अशाप्रकारे सक्ति करु शकत नाही. तसा त्यांना अधिकार नाही. आपल्या पाल्यासाठी आवश्यक शालेय साहित्य, वह्या पुस्तके, प्रयोग वही इ. तसेच अन्य साहित्य हवे तेथून घेऊ शकतात. पालकांनी संस्थाचालकांविरुद्ध संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे निर्देश ना. कडू यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वेळचे वेळी आढावा घेऊन पालकांच्या तक्रारींचे निराकरण करावे,असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web