बालकल्याण समितीला यश,सहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट

प्रतिनिधी.

अकोला – आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगी सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकेदायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशीच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यानी. शासनाच्या बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.आईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सिमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई…. 

दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव. संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजूरी करुन गुजराण. दि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटूंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्या सारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धायमोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला. आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार? हा यक्ष प्रश्न. मोल मजुरी केली नाही तर खाणार काय? पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार? आणि जो आता डोळ्याला दिसत नाहिय तो सुमित.. त्याचं काय? कुठं असंल, कसा असंल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल…! ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती. गावात जाऊन मोल मजूरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं.या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत. सुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरिक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली. जीव भांड्यात पडला खरा पण लेकरु ताब्यात मिळत नाही आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल? सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या. तोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं लॉक डाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूर हून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं. गाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसूसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळे टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा? अखेर माय लेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे. सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता. ही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घा टे आणि पेशवे नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web