टाटा समूहातर्फे महापालिकेला २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि १० कोटींचे अर्थसहाय्य

प्रतिनिधी.

मुंबई – समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोना सारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समुह सुरूवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहिला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत.

शासनासोबत नागरीक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करीत आहेत त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना कळात पहिल्या दिवसापासून सहकार्यासाठी टाटा समुहाचा सहभाग राहिला आहे. आताही त्यांनी २० रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. खर तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे सांगत त्यांनी टाटा समुहाने केलेल्या मदतीबद्दल आभार देखील मानले.

कोरोनामुक्त होण्यासाठी निर्भयपणे पावले उचचलील जात आहे त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावळी व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीमती पेडणेकर, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web