कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

प्रतिनिधी .

भंडारा – 1 जुलै माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषिदिन साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 1 ते 7 जुलै 2020 हा सप्ताह कृषी संजीवनी सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कृषि विद्यापिठाचे कुलगुरु व विद्यार्थी यांनी शेतकऱ्यांचे शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कृषि विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भूसे यांनी केले. पवनी तालुक्यातील निलज येथे शिवार फेरी व कृषि संजीवनी सप्ताहनिमित्त शेतकऱ्यांशी कृषि मंत्र्यांनी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी व्ही.जे. पाडवी, प्रगतीशिल शेतकरी संजय एकापूरे प्रामुख्याने उपस्थित होते. निलज येथिल प्रगतीशिल शेतकरी नरेंद्र ढोक यांनी प्रतिकूल परिस्थितीत कारल्याचे शेती करून आदर्श निर्माण केला. याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेती करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे तरच कृषि दिनाचा उद्देश सफल होईल, असे कृषि मंत्री यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, गोसेचे पाणी व वीज शेतकऱ्यांना उपलब्ध व्हाव्यात. अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचव्यात याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. याबाबत जाणीवपूर्वक लक्ष घालून शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल, असे ते म्हणाले. जिल्हयाची खताची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्याची जबाबदारी कृषि विभागाची आहे. शेतकऱ्यास खताचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावर्षी पाऊस लवकर आल्याने हंगामास लवकर सुरुवात झाली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना लागतो तेवढा खतांचा पुरवठा करण्यासाठी शासन तत्पर आहे. अतिरिक्त खताचा वापर करु नये त्यामुळे शेतीचे जीवनमान कमी होईल, असे त्यांनी सांगितले. कृषि विभागाने खतांच्या उपलब्धतेबाबत लक्ष घालून दुकानामध्ये गैरव्यवहार होणार नाही यांची दक्षता घ्यावी. गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदार व कंपन्यावर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तहसिलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. माझा शेतकरी बांधव आनंदी व सुखी झाला पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकार करा, असेही ते म्हणाले.कृषि विद्यापिठाप्रमाणे प्रगतीशिल शेतकरी चालते बोलते विद्यापिठ आहे. राज्यात 3 ते 4 हजार प्रगतिशिल शेतकरी गावागावात शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. टाळेबंदीच्या काळात राज्यात शेतकऱ्यांनी मोठा हातभार लावून धान्य व भाजीपाला कमी पडू दिला नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम उभे आहे, अशी ग्वाही कृषि मंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे ते म्हणाले.प्रारंभी नरेंद्र ढोक यांच्या कारल्याच्या बागेत कृषिमंत्र्यांनी शिवार फेरी करुन कारले, चवळी, काकडी, वालाच्या पिकाचे निरिक्षण करुन माहिती जाणून घेतली. सौर उर्जेवरील उपकरण,क्राप्ट पॉलीनेशन तसेच स्प्रिंगलर या अभिनव उपक्रमाची पाहणी केली. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी वन विभागामार्फत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय व जंगली श्वापदामुळे पिकाचे नुकसान, वनविभागाच्या आर्थिक सहाय्यतेचा अभाव तसेच श्वापदाच्या मृत्युमुळे शेतकऱ्यावर दाखल होणारे गुन्हे, धान खरेदी केंद्रात वाढ, गहु खरेदी केंद्राची आवश्यकता आदी प्रश्नांची जाणिव करुन दिली. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषीमंत्र्यांचे हस्ते प्रगतिशिल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, तहसिलदार तसेच ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web