भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी.

बारामती – शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना ‍भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज बारामती येथे विविध ‍ठिकाणी सुरु असणाऱ्या विकासकामांची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची , माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रिडा संकुल, गौतम बाग येथे सुरु असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करत आवश्यक सूचना केल्या. विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानामध्ये ‍टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी, आसपासचा परिसर सुशोभित करावा, कामाच्या ‍ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना  विकासकामांकरिता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा, विकासकामे ही दर्जेदार असावीत तसेच आवश्यक असल्यास वाढीव निधीबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.                             

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web