कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

प्रतिनिधी .

कोल्हापूर- येथील सीपीआर रूग्णालयामध्ये आजअखेर 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. यातील 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित तिघांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरेपी ट्रायल केंद्राचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई येथून सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रूग्णावर केलेली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री पाटील यावेळी म्हणाले, मुंबई येथील रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी कोल्हापूर येथून प्लाझ्मा पाठविण्यात आला होता. आजअखेर कोल्हापुरातील 8 रूग्णांवर प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे. यातील 5 रूग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर आघाडीवर असून मुख्यमंत्री महोदयांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन केले असून त्याला निश्चितपणे कोल्हापूर येथून चांगला प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या दोघांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web