कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा जिल्हा परिषदेचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी.

चंद्रपूर – खरीप हंगाम सन 2020 मध्ये शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदने विविध योजनेचे नियोजन केलेले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये उपयोगात येणाऱ्या विविध साहित्य व औजारे तसेच सेंद्रिय खते इत्यादींचा अनुदानीत पुरवठा करण्याचे योजीले आहे. शेती उत्पन्नामध्ये शेतमाल उत्पादनाची प्रक्रीया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ, सुकर व प्रभावी होण्याचे दृष्टीने तसेच शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढीचे नियोजन या वर्षी जिल्हा परिषद, कृषि विभागाने केलेले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षी जिल्हा परिषद कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामध्ये ग्रामीण शेतकऱ्यांना 75% अनुदानावर फायबर क्रेट, ताळपत्री पुरवठा, हिरवळीचे खत (ढेंचा बियाणे), सेंद्रिय खते, इत्यादी योजना उपलब्ध आहेत. तसेच शेतातील पिकावर दरवर्षी विविध किड व रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी 90% अनुदानावर किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शेतीला काटेरी तार, विद्युत कुंपन आस्थापीत करण्यासाठी 2 क्विंटल याप्रमाणात अर्थ सहाय्य तसेच पिव्हिसी, एचडीपीई पाईप खरेदीकरीता रु.361 प्रति नग या प्रमाणे अर्थसहाय्य,व्हर्मी कंपोष्ट बेडचा वापर करुन गांडुळ खत निर्मीती करणे करीता पुरवठा, विद्युत पंप (3 एचपी,5एचपी) तसेच बॅटरी चलित स्प्रे पंप या साहित्याकरीता अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमातंर्गत बायोगॅस सयंत्र बसविण्यासाठी केंद्र सरकारचे अनुदाना व्यतिरीक्त रु. 12 हजाराचे मर्यादीत अर्थ सहाय्य सुद्धा या वर्षी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतमालाचे उत्पादन वाढविणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे दरवर्षी खरीप हंगामात ध्येय असते, परंतु त्यास लागणारे खर्च हे अत्याधिक असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर असते व इच्छा असूनही तो त्या तंत्रज्ञानाचा वापर करु शकत नाही. याकरीता शेतकऱ्यांसाठी हळद लागवड तंत्रज्ञान व त्यासाठी लागणारे औजारे, धान लागवडीचे काम यंत्राद्वारे करण्याकरीता धान रोवणीचे मशिन, पिक कापणीची मशिन तसेच इतर आवश्यक अवजारे जसे की, ट्रॅक्टर चलित कल्टीवेटर, बिज पेरणी यंत्र, कल्टिवेटर, रिवर्सिबल प्लॉऊ, बेडमेकर इत्यादी साहित्य अवजारे ट्रॅक्टरसह हे संबंधित तालुक्यातील शेतमाल उत्पादक कंपनी यांचे मार्फतीने अनु.जाती,जमाती (90% अनुदानावर) व इतर मागास प्रवर्गातील शेतकऱ्यांना (75% अनुदानावर) मागणी केल्यास त्यांना याबाबीचा लाभ मिळू शकेल.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या सर्व प्रस्तावित योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती कृषि दुग्ध व पशु संवर्धन समिती सुनिल उरकुडे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web