सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण

प्रतिनिधी.

नांदेड – पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतू अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी यासंदर्भात बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारीसुद्धा केल्या आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती मागवली आहे. ते स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असताना आता संपूर्ण देशाची दारोमदार खरीप हंगामावर आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे चव्हाण यांनी बजावले आहे.

यासंदर्भात शासन कारवाई करेल. मात्र, दरम्यान शेतकऱ्यांनी वेळ न दवडता शेतातील ओलावा पाहून पर्यायी पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. दुबार पेरणीसाठी कृषितज्ज्ञांनी मूग, उडीद, तूर, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web