गुलाबबाई संगमनेरकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी.

मुंबई – तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास  राज्य शासनातर्फे  तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली.

गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिले. राधाबाई बुधगावकर पार्टी मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बबुताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता-घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित  महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून  उत्तम कला  सादर करून त्यांनी  अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. “गाढवाचं लग्न” या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  गुलाबबाई  संगमनेरकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web