वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

प्रतिनिधी.

मुंबई – कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी विविध माल वाहतूक संघटना व नागरी परिवहन उपक्रम यांच्या प्रतिनिधींसह परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल (Transport Task force) स्थापन करण्यात आले आहे.

राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासन विविध उपाययोजना करत आहे  त्याच पार्श्वभूमीवर “mission Begin Again” या अंतर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी  राज्यस्तरीय कृतीदल स्थापन करण्यात आले आहे. 

यात अपर मुख्य सचिव (परिवहन), सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई, उपाध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाव्यवस्थापक मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट, महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाचे प्रतिनिधी, विविध ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनाचे  प्रतिनिधी, अध्यक्ष महाराष्ट्र ट्रक, टेम्पो, ओनर्स असोसिएशन मुंबई, वेब बेस्ड टॅक्सी (ओला, उबेरसह) चालक संघटनांचे प्रतिनिधी, बस ॲन्ड कार ऑपरेटरर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (BOCI) यांचे प्रतिनिधी, मुंबई बस मालक संघटनांचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून तर सदस्य सचिव म्हणून परिवहन आयुक्त यांचा समावेश आहे. 

या राज्यस्तरीय कृतिदलाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहतुकीशी संबंधित बाबीमुळे होणारा परिणाम, वाहतूक व्यवस्थेतील  येणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून उपाययोजना करणे आणि परिस्थितीनुरूप वेळोवेळी निदर्शनास आलेल्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणे. यासाठी या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भात शुक्रवार  दिनांक 26 जून रोजी दुपारी 12:30 वाजता  व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web