आरोग्यसेतू ॲप’बाबत प्रभावी अंमलबजावणी करा – मुंबई शहर जिल्हाधिकारी

प्रतिनिधी.

मुंबई – मुंबई शहर जिल्ह्यात आरोग्यसेतू ॲपबाबत प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत कार्ड वाटप इष्टांक पूर्तीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सक्रिय व अधिक गतिमान होऊन हे दोन्ही कार्यक्रम राबवावे, असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिले आहेत.

या संदर्भात गो टू मिटिंग ॲपद्वारे आज आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालयात आलेले रुग्ण, त्यांच्यासोबतचे नातेवाईक यांना आरोग्यसेतू ॲप संदर्भात सविस्तर माहिती देऊन त्यांना ते ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्याविषयी सांगावे. तसेच यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इष्टांकपूर्तीसाठी जिल्हा समन्वयक यांनी ठोस कार्यक्रम सादर करुन तो राबवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीला जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मानकेश्वर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रविण भावसार, डॉ.प्रतिभा जाधव, डॉ.प्रियांशी यादव, इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे डॉ.एस.एस. उत्तुरे, डॉ.पंकज बंदरकर, डॉ.अनिल पाचणेकर, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे डॉ.वैभव माने, एनआयसीच्या कविता पाटील आदींनी सहभाग घेतला.  

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web