रत्नागिरीतील कातळ शिल्पांच्या जतन,संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील  सतरा गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाण युगातील कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या  शिल्पांच्या भोवती  संरक्षक भिंत आणि पर्यटकांसाठी अन्य सुविधा उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर, चवे, देऊद, उक्षी, उक्षी पोचरी, कापडगाव संगमेश्वर तालुक्यातील निवळी गावडेवाडी, उमरे, कोळंबे तर राजापूर तालुक्यातील कशेळी, देवी हसोळ, वाडी रुंध्ये, सोळगाव, बारसू (एका गावातीलच २ वेगवेगळी स्थाने), देवाचे गोठणे, गोवळ येथे ही कातळशिल्पे असून या शिल्पांचे स्थान,आजूबाजूची वस्ती, तेथील सद्यपरिस्थितीतील सुविधा आणि नैसर्गिक ठेवा ह्या आधारे शिल्पांच्या संवर्धनाचे नियोजन करण्यात येत आहे.

शिल्पाच्या सुरक्षा कुंपणासाठी जांभा दगड, माती ह्यांचा वापर करून पुरातत्व खात्याच्या नियमानुसार काम केले जाईल. त्याचप्रमाणे माहिती फलक, शिल्पे जमिनीवर कोरलेली असल्याने उंचावरून पाहण्यासाठी चबुतरा, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह,विश्रांतीस्थळ, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कशेळी येथील शिल्प सुमारे ५० फूट लांबीचे असल्यामुळे तिथे काही उंचीवर जाऊन बघण्यासाठी चबुतऱ्याबरोबरच अधिक उंचीच्या मचाणाचेही नियोजन आहे. यातील अनेक कातळशिल्पे ही वैयक्तिक मालकीच्या जागांवर आहेत. जमीन मालकांच्या परवानगीने ही कामे करण्यात येणार आहेत.

कातळ शिल्पांच्या जतन  आणि  संवर्धनाच्या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गयात्री या सामाजिक संस्थेचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला चांगले सहकार्य लाभले आहे. पुरातत्व वस्तूंच्या जतनाचा चांगला अनुभव असलेल्या जाणकारांकडून हे काम काळजीपूर्वक करण्यात यावे असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालकांना दिले आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web