सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या क्षेत्रात ठिकठिकाणी संरक्षण भिंत, पूल आदी उभारून सलग बंधारे निर्माण करण्यात यावेत, त्याचप्रमाणे, जल पुनर्भरण डोह निर्माण करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी आज अचलपूर, परतवाडा, शिरजगाव, करजगाव, चमक आदी विविध गावांना भेट देऊन तेथील नदी क्षेत्राची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू यावेळी म्हणाले की, नद्यांच्या क्षेत्रात संरक्षक भिंतीसह सलग बंधारे व जलपुनर्भरण डोह उभारावेत. त्यामुळे संबंधित परिसरातील करजगाव, शिरजगाव या भागातील पाण्याची पातळीत वाढ होऊन सिंचन वाढेल. परिसरातील शेकडो शेतक-यांना फायदा होईल.
अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरातून जाणा-या बिच्छन नदीवर पूल उभारून सौंदर्यीकरण करण्यात यावे. त्यात पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व सांडपाण्याचे निराकरण करण्याची तरतूद असावी. नदीच्या काठावर विविध वृक्षसंपदा, उद्याने निर्माण करुन सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web