आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे – धनराज वंजारी

प्रतिनिधी.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बिहार मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांना जबाबदार धरण्यात आले आहे. सुशांतची आत्महत्या ही एक मेंटल व सायकॉलॉजिकल लिंचींग असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हि त्यात मोडतात. अशा प्रकारे लिंचिंग करणाऱ्यांविरुद्ध सामाजिक दायित्व म्हणून वंचित बहुजन आघाडी एक मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी दिली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. पेरणी केली तर पाऊस नाही, बँका कर्ज द्यायला तयार नाही, बोगस बियाणांची विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत, सरकार मदत करायला तयार नाही जी मदत मिळते ती अपुरी असते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. परिणामी शेतकऱ्यांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण होते व तो आत्महत्या करतो. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही बिहार मधील मुजफ्फरपुर या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आली असून सुशांतने आत्महत्या केली नसून त्याच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व दिग्दर्शक जबाबदार असल्याचा संशय त्यात व्यक्त करण्यात आला आहे.
सुशांत प्रकरणात मुंबई मध्ये देखील एक जनहित याचिका दाखल झाली पाहिजे हे आपले सामाजिक दायित्व असून मेंटल लिचिंगवर कायदा करण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी मांडले. याबाबत लवकरच एक आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

         
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web