पुरेशा पावसाशिवाय पेरणी नको कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रतिनिधी.

सोलापूर – पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत खते, बियाणे यांची उपलब्धता, खरीप पीक कर्ज वाटप, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज वितरण अशा विविध बाबतीत चर्चा
झाली.
श्री. भुसे यांनी जिल्ह्याचा खताचा पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल. मागेल त्याला शेततळे, शेततळ्याला कागद आणि इतर योजनांसाठीच्या थकित अनुदानापोटीचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगितले.
सोयाबीनच्या बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत पंचनामे करा. त्याच कंपनीच्या बियाण्याबाबत पुन्हा तक्रार आल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करावी लागेल, याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. ज्या बँका पीककर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा, असे श्री. भुसे यांनी सांगितले.
श्री.बिराजदार यांनी हंगामाबाबत आढावा घेतला. कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक संतोष सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web