अघोरी उपचारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व्हावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रतिनिधी.

अमरावती – पोटफुगीवर उपचार म्हणून आठ महिन्याच्या चिमुकल्यावर गरम विळ्याचे चटके देण्याचा अघोरी प्रकार मेळघाटात घडला. सदर आठ महिन्याच्या चिमुकल्यावर जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उपचार होत आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या चिमुकल्याच्या प्रकृतीची चौकशी केले व योग्य उपचार करण्याचे निर्देश रूग्णालय यंत्रणेला दिले.
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोरथा येथील गावात पोटफुगी झालेल्या आठ महिन्याच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगत भूमकाकडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले. हा प्रकार कळताच काटकुंभ येथील भरारी पथकाने तत्काळ त्या चिमुकल्याच्या उपचारार्थ चुरणी येथे दाखल करून उपचार सुरु केले. दरम्यान, चिखलदरा पोलीसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकाच्या वडलांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेची दखल घेऊन आज महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी इर्विन रूग्णालयात धाव घेतली. या चिमुकल्याच्या प्रकृतीची संपूर्ण दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी रूग्णालय यंत्रणेला दिले. रुग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सध्याच्या कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना दुसरीकडे चिखलदरा तालुक्यात हा अघोरी उपचाराचा प्रकार दिसून आला आहे. या घटनेत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
त्या यावेळी म्हणाल्या की, चिखलदरा तालुक्यात घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून, मेळघाटात सक्षम आरोग्य यंत्रणेसह प्रबोधनाची गरज दर्शविणारी आहे. त्यामुळे येथे काम करताना आरोग्य, ग्रामविकास, वन, पोलीस, महसूल अशा विविध विभागांच्या समन्वयाने सातत्यपूर्ण प्रबोधन मोहिम चालविणे आवश्यक आहे. ग्रामपातळीवर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व इतर विभागातील अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश करून सर्वंकष मोहिम राबवावी. स्थानिक बोलीत जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबवावेत.
आरोग्य यंत्रणा, महसूल, ग्रामविकास, कृषी यंत्रणांच्या ग्रामपातळीवरील कर्मचा-यांच्या समन्वयातून प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यापुढे असे प्रकार घडता कामा नयेत. जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन अशा प्रकारांना तत्काळ आळा घालण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web