महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे

प्रतिनिधी.

यवतमाळ – कोरोना प्रार्दुभावामुळे स्थगित करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुनश्च सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांचे रुपये दोन लाखपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 जाहीर केली होती. तथापि या योजनेची अंमलबजावणी सुरु असताना कोरोना विषाणु रोगाच्या आजाराचा प्रार्दुभाव होऊ नये याकरीता दिनांक 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संबंधातील पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रीया बंद ठेवण्यात आली होती. यादरम्यान ज्या शेतक-यांची नावे कर्जमुक्तीचे यादीमध्ये आली आहेत, त्यांचे आधार प्रमाणिकरणाची कार्यवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे, अशा शेतकऱ्यांना सन 2020-21 चे खरीप हंगामात नव्याने पीक कर्जवाटप करण्यासाठी दिनांक 22 मे 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्यामुळे योजनेतील पात्र शेतक-यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी व अशा शेतकऱ्यांना बँकेने पीक कर्जवाटप करावे, अशा सूचना बँकाना दिलेल्या आहेत.
योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्यांचे नाव संबंधित यादीमध्ये पाहून कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सुविधा केंद्र, कॉमन सर्व्हीस सेंटर अथवा संबंधीत बँक शाखा येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, यादीमधील विशिष्ट क्रमांक इत्यादी माहिती घेऊन आधार प्रमाणिकरण करावे. याकरीता प्रशासनामार्फत वेळोवळी दिल्या जाणाऱ्या सूचना तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी केले आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web