कापूस खरेदीत तफावत आढळल्याने कारवाईचे निर्देश, जिनिंगला जिल्हाधिका-यांची अचानक भेट

प्रतिनिधी

यवतमाळ – शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदीबाबत गत आठवड्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यात सीसीआय व कॉटन फेडरेशन यांना कापूस खरेदीबाबत अंतिम नियोजनसुध्दा आखून देण्यात आले होते. त्यानुसार रोज किमान किती गाड्या कोणत्या जिनिंगवर जाईल, आदी सुचना देण्यात आल्या. तरीसुध्दा दारव्हा येथील जाधव जिनिंगमध्ये कापूस खरेदीबाबत मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहे.
दारव्हा येथील जाधव जिनिंगला जिल्हाधिका-यांनी अचानक भेट देऊन कापूस खरेदीबाबत आढावा घेतला. सदर जिनिंगमध्ये रोज किमान 50 गाड्या घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र या जिनिंगमध्ये अतिशय कमी गाड्या घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतक-यांना कापूस खरेदी करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. जाधव जिनिंगमध्ये 15 जून रोजी 24 गाड्या, 16 जून रोजी 17 गाड्या, 17 जून रोजी एकही गाडी नाही शिवाय जिनिंगमध्ये कापूस खरेदी बंद आणि 18 जून रोजी केवळ 10 गाड्या कापूस खरेदी करण्यात आली. त्यामुळे दारव्हा येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची जिल्हाधिका-यांनी झाडाझडती घेतली. ठरवून दिलेल्या किमान गाड्यानुसार कापूस खरेदी झाली नाही तर यापुढे कडक पाऊले उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
जिल्हा उपनिबंधक, सीसीआय व कॉटन फेडरेशन यांनी समन्वय साधून कोणत्याही परिस्थतीत नोंदणीकृत शेतक-यांच्या घरातील कापूस खरेदी करावा. नेर, दारव्हा, दिग्रस आणि आर्णी येथील जिनिंगमध्ये सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यात येईल. 8987 शेतक-यांचा कापूस सीसीआय तर उर्वरीत 8414 शेतक-यांचा कापूस फेडरेशनने खरेदी करण्याबाबत नियोजन आखून देण्यात आले होते. तसेच सर्व सहाय्यक निबंधकांनी नोंदणीधारक शेतक-यांना संदेश, ठरवून दिलेल्या गाड्यांचे नियोजन आदी कामे प्राधान्याने करावी, असेही पालकमंत्र्यांच्या बैठकीत सांगण्यात आले होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web