कोरोचीत टेपिंगसह तयार होणारे पीपीई किट डिआरडीओ प्रमाणित

प्रतिनिधी.

कोल्हापूर – कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका,आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजीजवळील कोरोची येथे अगदी माफक दरात उत्पादन सुरु केले आहे. टेपिंगसह 90 जीएसएम लॅमिनेटेड आणि 60 जीएसएम 5 लेयर डबलएस डबलएमएस ब्रिदेबल सद्या असे दोन प्रकारचे पीपीई किट तयार केले जात आहेत. याचे कापड सीट्राने तर पूर्ण किट डीआरडीओने प्रमाणित केले आहे.
श्री. घोरपडे यांची युवा क्लोथींग कंपनी श्रीपाद गारमेंट कोरोची येथे आहे. याठिकाणी आठ वर्षांपासून ते उत्तम दर्जाच्या शर्टची निर्मिती करत आहेत. कोव्हिड-19 या विषाणूने जगाबरोबरच आपल्या देशात शिरकाव केला आहे. राज्यामध्ये याचे प्रमाण वाढलेले आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्र मोठी जोखीम घेवून अशा रुग्णांवर उपचार करत आहे. आपल्या जिल्ह्यामध्येही कोव्हिड-19 संशयित आणि बाधित रुग्णांवर डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक आणि सहायक कर्मचारी मोठ्या धाडसाने आणि कर्तव्यनिष्ठेतून उपचार करत आहेत. मात्र या उपचारकर्त्यांचे सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाणाऱ्या पीपीई किटची बाजारामध्ये कमतरता आहे, हे वाचून युवराज घोरपडे यांनी कोरोची येथे संचारबंदीच्या काळात विशेष परवानगी घेवून पीपीई किटची निर्मिती सुरु केली आहे.
यासाठी लागणारे 5 पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे 60 जीएसएम नॉन ओव्हन कापड हे तामिळनाडूमधील कोईमब्तूर येथून शासनाच्या निकषाप्रमाणे मागवले आहे. हे कापड मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवून त्याचे प्रमाणिकरण करुन घेतले. त्याचबरोबर कोईमब्तुर येथील सीट्रानेही प्रमाणित केले आहे. सद्या या ठिकाणी जिल्ह्यात प्रथमच टेपिंग करण्याचे मशिन आले आहे. या मशीनव्दारे तयार होणारे टेपिंगसह पीपीई किट दिल्ली येथील डीआरडीओ-आयएनएमएएस कडूनही प्रमाणित झाले आहे.
याविषयी माहिती देताना युवराज घोरपडे म्हणाले, सद्या दोन प्रकारचे पीपीई किट तयार केले जात आहेत. 90 जीएसएम लॅमिनेटेड आणि 60 जीएसएम 5 लेयर डबलएस डबलएमएस ब्रिदेबल आहे. आयसीयु किंवा रेड झोनमध्ये येत नसाल तर हे किट 10 ते 12 वेळा धुवून वापरू शकता. शिलाई करताना सुईमुळे होणाऱ्या छोट्या छिद्रांमधूनही रक्त अथवा कोणत्याही प्रकारचे द्रव्य कण आतमध्ये जाणार नाहीत यासाठी सद्या या किटला टेपिंग मशीनच्या सहाय्याने टेपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विषाणूचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्हीही आयसीयुमध्ये वापरू शकता. 5 पदरी कापडामुळे वॉटर रेफिलंट क्षमता ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या 3 पदरी किटपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यावर पाण्याचा शिडकाव केल्यास पलिकडच्या बाजूला पाणी जाणार नाही. जेव्हा एखादा रुग्ण शिंकतो त्या हवेच्या दाबाप्रमाणे जरी पाण्याचा शिडकाव केला तरी देखील ते पाणी शरिरापर्यंत पोहचणार नाही. अशी पूर्ण काळजी घेवून याची निर्मिती केली आहे. अत्यंत माफक किंमतीला आम्ही याची विक्री करत आहोत, असेही ते म्हणाले.
कोरोना बाधित आणि संशयितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे सुरक्षा कवच म्हणजेच पीपीई किट इचलकरंजीजवळील कोरोचीमध्ये तयार होत आहे. तेही पूर्ण दक्षता घेवून अगदी माफक दरात उपलब्ध होत आहे. ही दिलासा देणारी मोठी बाब आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web