नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा

मुंबई – राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे,  अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी दिली आहे.

नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळवणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्ययावत करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.

उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे, असे श्रीमती कुबल यांनी स्पष्ट केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web