विद्यापीठ लॅब,विविध रोग चाचण्यांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा – महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर

प्रतिनिधी.

अमरावती – कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन अत्यंत कमी काळात उभारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील केंद्रीय उपकरणीकरण कक्ष येथील कोरोना चाचणी लॅबकडून एका महिन्यात साडेचार हजारांहून अधिक अहवाल देण्यात आले असून त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळत आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनीही याप्रमाणे प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यांच्यासाठी अमरावतीतील लॅब मार्गदर्शक ठरली आहे. कोरोना संसर्ग चाचणी अहवालांप्रमाणेच इतरही विविध चाचण्यांचे अहवाल यापुढील काळात प्राप्त होण्यासाठी ही अमरावतीत कायमस्वरूपी सुविधा झाली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी वक्त केली आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रणा मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांना आरंभ झाल्यानंतर सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात संशयितांचे घेतलेले थ्रोट स्वॅब नागपूर, वर्धा व अकोला येथील प्रयोगशाळांत तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र, पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी अमरावतीत प्रयोगशाळा व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा नियोजनातूनही तत्काळ निधीही उपलब्ध करून दिला. श्रीमती ठाकूर यांनी लॅब सुरू होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. ही लॅब कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात स्थापित झाली. आवश्यक तपासण्याकरिता यंत्रणा व आयुर्विज्ञान संस्थानतर्फे मान्यता मिळविण्यात आली. पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून लॉगिन आयडी सुद्धा मिळवून दिला. बायोसेफ्टी गाईडलाईन्स व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ covid-19 करिता असलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार लॅबला मान्यता प्रदान होताच ४ मेपासून अहवाल प्राप्त व्हायला सुरुवात झाली.

यंत्रणा अधिक सक्षम करणार

या प्रयोगशाळेत आतापर्यंत दिवसाला साधारणतः शंभर ते सव्वाशे अहवाल मिळत आहेत. तीन शिफ्टमध्ये यंत्रणा काम करते. चाचणी अहवालाची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ऑटोमेटेड मशीन व इतर यंत्रणा मिळवून देणार जेणेकरून दिवसाला साडेतीनशे अहवाल मिळू शकतील, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीच्या तज्ज्ञांकडून इतरांना प्रशिक्षण

अमरावती विद्यापीठ लॅबचे हे काम पाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही आता लॅब सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूर विद्यापीठाची एक तुकडी नुकतीच अमरावतीत आली होती. लॅबची रचना , कार्यपद्धती याबाबत त्यांना आवश्यक प्रशिक्षणही यावेळी देण्यात आले.त्याचप्रमाणे, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या तुकडीलाही प्रशिक्षण देण्यात आले.

प्रयत्नांना गती व अचूकता आली

लॅब सुरू होण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न व सहभाग राहिला आहे. चाचणी अहवाल लवकर मिळत असल्याने आरोग्य यंत्रणा, पोलीस व प्रशासन यांना दिलासा मिळून प्रयत्नात अचूकपणा येण्यास मदत होत आहे. सगळ्यांच्या प्रयत्न, सहकार्य व एकजूटीतूनच आपण कोरोनाच्या महासंकटावर मात करू शकू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे

या लॅबमध्ये चार खोल्या सलग टेस्टिंगकरिता असून सुरक्षिततेचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागातील प्रोफेसर डॉ. प्रशांत ठाकरे हे या लॅबचे नोडल अधिकारी असून सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.डॉ. नीरज घनवटे व वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रशांत गावंडे हे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय डॉ. मुकेश बुरंगे, एमडी, पॅथॉलॉजी व डॉ.उज्वला कवाने, एमडी, मायक्रोबायोलॉजी स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती हे वैद्यकीय अधिकारी तपासणी अहवाल सादर करतात. याशिवाय टेस्टिंग करिता संशोधक विद्यार्थी कु. निलू सोनी, कु. प्रज्ञा पिंपळकर, कु. पुजा मालवीय, श्री योगेश बेले यांची मदत होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web