विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी शासन लवकरच घोषित करणार सकारात्मक निर्णय

प्रतिनिधी .

अलिबाग – रायगड निसर्ग या चक्रीवादळामुळे कोकणच्या चारही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांच्या नुकसानी पासून तर शेतीचे, नारळाच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसाच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घोषित करणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी  येथे केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा दिवसभर पाहणी दौरा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, जिल्हा कृषी अधीक्षक पांडूरंग शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदि उपस्थित होते,
उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नुकसानीची सविस्तर आकडेवारी पंचनाम्यासह लवकरात लवकर सादर करण्यात यावी. जवळपास 25 ते 75 वर्षापूर्वीची सुपारी, आंब्याची झाडे, फळबागा नष्ट झाल्या असून पुढची काही वर्षे हीच झाडे शेतकरी बांधवांना उत्पादन देणार होते. आता नवीन रोपे लावून फळबाग उभ्या केल्या जाणार असल्या तरी साधारण पाच ते सात वर्षानंतरच शेतकरी बांधवांना त्यातून उत्पादन मिळू शकणार आहे. म्हणूनच या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी पंचनामे करावेत. पंचनामे करताना त्या शेतकऱ्याचे किती क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे, त्याच्या फळझाडांची संख्या किती होती, या नोंदींशिवाय त्याच्या फळझाडांच्या वयाचीही नोंद पंचनाम्यात करावी.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वी जे काही विहित नियम आहेत त्या विहित नियमांच्या पेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे सांगून ते पुढे म्हणाले, नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची जी काही फळझाडे आहेत ती फळझाडे बाजूला करणे, यासाठी शेतकरी बांधवांना मोठा खर्च येणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला रोजगार द्यावा. जेणेकरुन त्या फळबागांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, इकडे तिकडे पडलेली झाडे बाजूला करणे हे एक मोठं काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल.
ज्या फळांची झाडे अर्धवट तुटलेली आहेत त्यांचे पुर्नजीवन करता येईल का? याची चाचपणी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या मदतीने केली जाणार असून जिथे पूर्णपणे झाडे नाहीशी झालेली आहेत त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून, विद्यापीठाकडे उपलब्ध असलेल्या रोपांच्या सहाय्याने आणि कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनांच्या माध्यमातून त्या बागा पुन्हा उभ्या करण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web