बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, एकत्र येऊन लढा देऊ – सुजात आंबेडकर

प्रतिनिधी.

पुणे – राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे, त्याला पोलिसही जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
विराज जगताप याच्या हत्येप्रकरणी अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, राज्यात मागासवर्गीयांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून पोलीस तातडीने कारवाई करीत नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अरविंद बनसोड प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणात आरोपी हे गृहमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. तर विराज जगताप प्रकरणात हल्ला झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो बोलू शकत होता तरीही पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. भाजपच्या काळात या समाजावर दडपशाही होती. मात्र आघाडी काळात त्यात काहीच सुधारणा झाली नाही. हल्ल्याचे प्रमाण वाढतच आहे. सर्व प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी यांनी आवाज उठवल्यानंतर कारवाई करण्यात आली. अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी दिली. हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने हल्लेखोरांवर कारवाई केली जात नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण ताकदीने, संयमाने पुढे जाऊन लढा द्यायचा आहे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web