ठाण्याची केंद्रीय पथकाची पाहणी प्रतिबंधित झोन,कोव्हीड हॉस्पीटलला दिली भेट

प्रतिनिधी.

ठाणे – कोरोना कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आज केंद्रीय पथकाने ठाणे शहरामधील प्रतिबंधित क्षेत्र, कोव्हीड हाॅस्पीटल्स, कोव्हीड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजना आणि केलेली कार्यवाही याची महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. दरम्यान ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारण्यात येत असलेल्या १००० बेडच्या हाॅस्पीटलची पाहणी करून केंद्रीय पथकाने महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
सनदी अधिकारी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने काल सकाळपासून ठाणे शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. सर्वप्रथम त्यांनी मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रतिबंधित झोन, घरोघरी करण्यात येणारे ताप सर्वेक्षण, कोव्हीड योद्धा याविषयी माहिती घेतली. तसेच कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा प्रेक्षागृह येथे उभारण्यात येत असलेल्या १००० खाटांच्या कोव्हीड हाॅस्पीटलची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी लोकमान्यनगर- सावरकर नगर प्रभाग समितीला भेट दिली. याभेटीमध्ये त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रे, फिव्हर क्लिनिकची पाहणी केली. तसेच तेथील डाॅक्टरांशीही चर्चा केली.
या केंद्रीय पथकाने महापालिकेच्या भायंदरपाडा येथील कोव्हीड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरला भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला. या पथकासोबत महापालिका आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

—-

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web